त्या बार्जचा मिऱ्या किनाऱ्यावरील मुक्काम लांबणार

रत्नागिरी:- रत्नागिरीतील भगवती बंदर येथून भरकटलेले बार्ज वादळात मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावर येऊन आदळले. बार्जवरील 13 क्रू मेम्बर्सना वाचवण्यात आले असले तरी बार्जचा मिऱ्या किनाऱ्यावरील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. या बार्जला तीन ठिकाणी गळती आहे. ही गळती काढल्यानंतरच बार्जसाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येणार आहे.

कारवार येथून डिझेल घेऊन निघालेले बार्ज मंगळवारी रत्नागिरीत दाखल झाले. वादळाच्या पार्श्वभूमीवर भगवती बंदर येथे नांगर टाकून बार्ज उभे करण्यात आले. या बार्ज वर 13 क्रू मेम्बर्स होते. बुधवारी पहाटे निसर्ग चक्रीवादळ रत्नागिरी किनारपट्टीवर धडकले. वादळी वारा आणि उधाणाच्या लाटांनी बार्जचा नांगर तुटला आणि बार्ज समुद्रात भरकटले. उधाणाच्या लाटांनी आणि वेगवान वाऱ्यामुळे बार्ज मिऱ्या किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले. बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बार्ज धूप प्रतिबंधक किनाऱ्यावर येऊन आपटले. यानंतर तीन तासानंतर बार्जवरील 13 क्रू मेम्बर्सच्या बचावासाठी मोहीम हाती घेण्यात आली. 13 जणांना बाहेर काढून क्वारंटाईन करण्यात आले आहे.
 

13 जणांना बार्ज वरून बाहेर काढण्यात यश आले असले तरी उधाणाच्या लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे बार्ज बंधाऱ्यावर आणि समुद्रातील दगडांवर आदळून दोन ते तीन ठिकाणी फुटले. यामुळे बार्ज मधून डिझेल गळती सुरू झाली. तातडीने डिझेल साठा सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला. डिझेल साठा आणि क्रू मेम्बर्स बार्ज मधून बाहेर काढण्यात आले असले तरी संबंधित बार्जचा मुक्काम आणखी काही दिवस मिऱ्या किनारी राहणार आहे. 
 

संबंधित बार्ज हे शारजाह दुबई येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित कम्पनीचे अधिकारी पुढील काही दिवसात रत्नागिरीत दाखल होण्याची शक्यता आहे. यानंतर बार्जला असलेली गळती काढण्यात येईल. रत्नागिरीत उपलब्ध टगच्या मदतीने बार्ज काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून यासाठी किमान पंधरा दिवसाचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. या कालावधीत पावसाचा जोर वाढल्यास बार्जचे रेस्क्यू ऑपरेशन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.