रत्नागिरी:- रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संकट टळले आहे. ज्या पद्धतीने अंदाज वर्तविण्यात आला होता तशी परिस्थिती उद्भवली नाही. त्यामुळे सुदैवाने दोन्ही जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने फार मोठे नुकसान झाले नाही. पडझड मात्र झाली आहे. झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई येत्या आठ दिवसात दिली जाईल, अशी माहिती ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातले. सायंकाळनंतर वादळाचा जोर पूर्णपणे कमी झाला होता. मात्र या वादळी वार्यातदेखील शहरात सुरू असलेली पडझड पाहण्यासाठी ना. उदय सामंत आपल्या सहकार्यांसह बाहेर पडले होते. शहरात व ग्रामीण भागात ठिकठिकाणी भेटी देवून त्यांनी झालेल्या पडझडीची पाहणी केली. भर पावसात भिजत ना. उदय सामंत हे मतदारसंघात ठाण मांडून होते. यावेळी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेशदेखील ना. सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
यावेळी बोलताना त्यांनी भगवती बंदर येथे समुद्रात भरकटलेल्या जहाजाचीदेखील माहिती दिली. या जहाजाची पाहणी करून सर्व माहिती त्यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली.या जहाजावर एकूण १३ खलाशी असून त्यातील ३ खलाशी परदेशी व १० खलाशी भारतीय आहेत. हे सर्व खलाशी परदेशातून आले असल्याने सर्वांची कोरोना टेस्ट करूनच त्यांना सोडले जाणार असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.या जहाजाची इंधन टँक फुटल्याची अफवा पसरल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत ना. उदय सामंत यांनी सांगितले की, हे जहाज पूर्ण रिकामे असून केवळ त्याच्या प्रवासासाठी आवश्यक असलेलेच इंधन त्यामध्ये आहे. त्यामुळे इंधन टाकी फुटली अशी अफवा पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु असा कोणताही धोका नसल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.दरम्यान, हे जहाज मिरकरवाडा धूपप्रतिबंधक बंधार्यावर आदळल्याने जहाजाच्या ऑईल टँकला दणका बसून एक इंचाचे छिद्र पडल्याने त्यातून ऑईल बाहेर येत आहे. कोस्टगार्डला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. संबंधित यंत्रणेच्या सहकार्याने या जहाजातील इंधन काढून जहाज रिकामे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ना. उदय सामंत यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, सुदैवाने रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात फार मोठे नुकसान झालेले नाही. पडझड मात्र झाली आहे. हे वादळ दोन्ही जिल्ह्यामधून पुढे गेल्यानंतर त्या त्या जिल्ह्यातील तलाठ्यांकडून पंचनामे केले आहेत. येत्या आठ दिवसात नुकसानीची भरपाई दिली जाईल असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.