भरकटलेले बार्ज वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

रत्नागिरी:- भगवती बंदर येथून भरकटलेले बार्ज बुधवारी सकाळी पांढरा समुद्र येथील बंधाऱ्यावर येऊन धडकले. यावेळी समुद्राला भरती असल्याने बार्जवर भल्या मोठ्या लाटा येऊन आदळत होत्या. या बार्जवर 23 क्रू मेम्बर असून समुद्राच्या उधाणामुळे या क्रू मेंबर्स च्या बचावकार्यात अडथळा येत होता. 

अखेर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास या 23 क्रू मेम्बर्सच्या बचावासाठी मदतकार्य हाती घेण्यात आले. बार्जवरून एक रस्सी किनाऱ्यापर्यंत आणण्यात आली. या रस्सीच्या मदतीने सर्व क्रू मेम्बर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले. याच दरम्यान वादळी पाऊस पुन्हा सुरू झाल्याने मदतकार्यात अडथळा आला. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सर्व क्रू मेम्बर्सना बाहेर काढण्यात आले.

यानंतर बार्जच्या बचावासाठी रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. बार्ज बंधाऱ्यावर आदळल्याने बार्जची टाकी लिकेज झाली आणि डिझेल गळती सुरू झाली होती. उधाणाच्या लाटांनी बार्जला काही प्रमाणात नुकसान झाले होते. बार्ज सहीसलामत बंदरातून बाहेर पडावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.