‘निसर्ग’ने उघडले डोळे; जिल्ह्याची आपत्कालीन यंत्रणा कोमातच

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेला जागे केले. प्रशासनाने पोलिस दल, आरोग्य यंत्रणा, एन.डी.आर.एफ पथके आणि ग्राम कृती दल व स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या सहकार्याने जिल्ह्यात वादळातही ‘शून्य जीवितहानी’ चे लक्ष्य गाठण्यात दावा केला असला तरी साधनसामग्री आणि तत्परतेच्या दृष्टीने ही यंत्रणा अतिशय दुबळी असल्याचे समोर आले आहे. मिऱ्या किनाऱ्यावर फसलेल्या बोटीतील क्रू मेम्बर्सपर्यंत मदतकार्य पोचवताना आलेल्या मर्यादा आप्तकालीन यंत्रणेची मर्यादा स्पष्ट करत आहेत.

जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा बुधवारी तडाखा बसला. नैसर्गिक आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाची तयारी असल्याचे सांगितले. चक्रीवादळाची सूचना प्राप्त होताच संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेवून प्रशासनाने कामाचे नियोजन केले. किनारपट्टीपासून 6 किमीपर्यंतच्या गावातील कच्च्या घरातील लोकांना स्थलांतरित केले. सर्व विभाग पूर्ण क्षमतेने काम करतील प्राणहानी होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना केल्या. नागरिक घराबाहेर पडू नयेत यासाठी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे निम्मा अधिक धोका कमी झाला. किनारपट्टीलगत धोकादायक भागातील लोकांसाठी दवंडी पिटणे, आकाशवाणी केंद्रावरून संदेश देऊन जनजागृती केली. स्थलांतराचे महत्त्वाचे काम वादळाच्या 24 तास आधी पूर्वी करण्यात आले. याचा धोका दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्यांना अधिक होता. येथे किनारपट्टीवरील गावांमधून 5 हजार 156 जणांचे स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

प्रत्यक्ष वादळामध्ये झाडे पडणे, तारा तुटणे असे प्रकार घडले. मात्र नियोजनामुळे अवघ्या 12 तासात सर्व रस्ते सुरळीत झाले. वादळ शांत होताच एका बाजूला तलाठ्यांनी पंचनाम्याचे काम सुरु केले. वीज वितरण कंपनीने सायंकाळपूर्वी शहराचा विद्युत पुरवठादेखील सुरु केला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी मैदानात उतरुन प्रत्यक्षपणे मदतकार्यात हातभार लावला. नैसर्गिक संकटात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत करणार्‍या जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहे. यापूर्वी फायबर किंवा रबरी बोट, लाईफ जॅकेट, दोरखंड, टॉर्च आदी साहित्य नियंत्रण कक्षात दिसत होते. पावसापूर्वीची तयारी म्हणून प्रात्यक्षिक केली जात होती. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ही यंत्रणा कुठे दिसतच नाही. सामाजित संस्था, एनडीआरएफच पथक यांच्यावर प्रशासनाला अवलंबुन राहावे लागते हे दुर्दैव.कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी यंत्रणा
आज मिर्‍यावर भरकटलेल्या जहाजातून कर्मचार्‍यांना वाचविण्यासाठी कोणतीच यंत्रणा नव्हती. स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. ही वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मजबूत होण्याची गरज आहे.