धडकी भरवणारे वादळ धडकले; अनेक ठिकाणी पडझड

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाने रत्नागिरीच्या किनारपट्टीवर प्रवेश केला असून मध्यरात्रीपासून जोरदार वारे वाहत आहेत. बुधवारी पहाटेपासून वाऱ्याचा वेग भयानक वाढला आहे. पूर्णगड, पावस, रत्नागिरी, मालगुंड, जाकादेवी, हेदवी हे भाग चक्रीवादळाच्या ब्लू झोन मध्ये गेले असून या क्षणाला वाऱ्याचा वेग ताशी 90 किमी पेक्षा जास्त आहे. 
 

संगमेश्वर पासून अगदी कोयनेपर्यंत वाऱ्याचा वेग तशी 90 किमी पेक्षा जास्त आहे. तर जयगड किनाऱ्यावर हा वेग ताशी 110 किमी पेक्षा जास्त झाला आहे. जसजसे चक्रीवादळ पुढे सरकेल तसतसे दापोली आणि मंडणगडच्या किनारपट्टीवरील वाऱ्याचा वेग ताशी 120 किमी पेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, बाहेर पडू नये आणि संकटकाळी आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. दुपारी 12 पर्यंत वादळाचे पडसाद दिसून येण्याची शक्यता आहे.