वादळाचा धोका; जीवावर उदार होत शेकडो नौका समुद्रात 

रत्नागिरी :- पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याला ‘निसर्ग’ वादळाचा धोका आहे. खबरदारी घेण्याचे जिल्हा प्रशासनाकडून निर्देश देण्यात आले आहे. कोणीही मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या इशाराकडे दुर्लक्ष आणि सूचनांना हरताळ फासत अनेक  बोटी मासेमारिकरता अद्यापही समुद्रातच आहेत. सूचना देऊनही त्या अद्यापही माघारी परतलेल्या नाहीत. सकाळपासून ढगाळ वातावरण होते.

मंगळवारी किनारी भागात हलका वारा सुरु होता. 11 वाजल्यानंतर पावसाने सुरुवात केली. जिल्हाप्रशासनाने सतर्क राहा असे आवाहन केले आहे. वादळाचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दोन दिवस संचारबंदी लागू राहणार असून ३ जून रोजी जनता कर्फ्यू घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. समुद्रकिनार पट्टी लगतच्या लोकवस्तीना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.  मुसळधार पावसाचा अंदाज आहे.  कोणीही मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे स्पष्ट आदेश देण्याता आले आहे. तरीही रत्नागिरीतील शेकडो मासेमारी बोटी समुद्रात आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून बोटींना माघारी फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, मच्छिमारी बोटीकडून मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा धोका कायम  आहे.