मनोरुग्णाला परिचरकडून बेदम मारहाण; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- मनोरुग्णास पुरुष परिचरने प्लास्टिकच्या पाईपने जबर मारहाण केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मारहाणीची ही घटना २९ मे रोजी रात्री ९.३० वा.सुमारास प्रादेशिक मनोरुग्णालयातील आसरा वॉर्डमध्ये घडली . काशिराम सखराम शिंदे ( रा.क्रांतीनगर , रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित परिचराचे नाव आहे. त्याच्याविरोधात प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधिक्षक नितीन मोहन शिवदे ( ४५ , रा.उद्यमनगर , रत्नागिरी ) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

त्यानुसार, विनय मोहन जुगुल ( २६ ) हा मानसिक रुग्ण असल्याने त्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारांदरम्यान, शुक्रवार २९ मे रोजी काशिरामने विनयला प्लास्टिकच्या पाईपने छातीवर, पोटावर आणि मांडीवर जबर मारहाण केली. ही बाब अधिक्षक नितीन शिवदेंना समजताच त्यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती देउन तसेच विनयची वैद्यकिय तपासणी करुन सोमवार १ जून रोजी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.