पहाटे धडकणार वादळ; दुपारपर्यंत जाणवणार परिणाम

रत्नागिरी:- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता असल्यामुळे मंडणगड, गुहागर, दापोली या तीन तालुक्यातील सुमारे चार हजार लोकांचे स्थलांतर जिल्हाप्रशासनाकडून करण्यात आले आहे. या चक्रीवादळामुळे परिणाम उद्या पहाटेपासून सुरु होणार असून 9 ते 12 या कालावधीत ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे वीजपुरवठा पूर्णतः खंडित ठेवण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

एनडीआरएफची वीस जणांची तुकडी जिल्ह्यात दाखल झाली असून दापोली येथे थांबणार आहे. दुसरी तुकडी दाखल होत असून ती मंडणगडमध्ये थांबवण्यात आली आहे. आपत्तीला सामोरे जाण्यासाठी चार बोटी, कटर, लाईट यासारखे साहित्य या पथकाकडे उपलबध आहे. आवश्यकता भासल्यास मत्स्य विभागाच्या सहकार्याने मच्छीमारी नौकांची मदत घेतली जाईल. 

वादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोली, गुहागर या किनारी भागांना बसू शकतो. रत्नागिरी, राजापूरचा किनारी भाग कमी प्रभावीत होईल. मंडणगड तालुक्यातील बाणकोट, वेसवी, वेळास या किनारी भागातील सुमारे 1200 लोकांना, दापोलीतील 235 तर गुहागरमधील 1196 लोकांचे स्थलांतर केले आहे. दापोली तालुक्यातील 23 गावे किनार्‍यावर असून त्यांच्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. या तिन तालुक्यातील पावणेतीन हजार लोकांचे स्थलांतर केले आहे. चार हजार लोक स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

पहाटेपासून वादळाचा प्रभाव जाणवण्यास सुरवात होईल. त्याचा वेग 9 वाजता वाढेल. ताशी 80 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. त्यामुळे किनारी भागातील गावांमध्ये मोठी हानी होऊ शकते. सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. तालुकास्तरावर औषधसाठा, 64 रुग्णवाहिका सज्ज आहेत. फयाननंतर दहा वर्षांनी अशाप्रकारचे वादळ निर्माण होत आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. गावपातळीवर मदत करण्यासाठी खासगी संस्थांचे सदस्यांसह प्रशिक्षीत तरुणांना पथकात सहभागी करुन घेतले आहे.