जिल्ह्यातील 67 गावांवर राहणार करडी नजर

पावसाळ्यासाठी आराखडा; कोरोनासाठी आरोग्य केंद्र सज्ज

रत्नागिरी:- पावसाळ्यात निर्माण होणार्‍या साथींवर मात करताना आरोग्यदृष्ट्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आराखडा तयार केला आहे. त्यात जोखीमग्रस्त, साथग्रस्त आणि नदीकाठची अशी मिळून 67 गावांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. जिल्हा परिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन केला असून दहा पथके कार्यरत झाली आहेत. पावसाळ्यात कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्राना सतर्कतेच्या सुचना दिल्या गेल्या आहेत. 
 

साथरोगांसह पूरग्रस्त भागांबरोबरच कोरोनाचे मोठे संकट जिल्ह्यावर आहे. चाकरमानी गावागावात दाखले झाले असून त्यांच्यावरही लक्ष ठेवण्याची जबाबदारी राहणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या सुचनानुसार कार्यवाही सुरु आहे. जिल्हा परिषद, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्रात नियंत्रण कक्ष, तालुक्याच्या ठिकाणी वैद्यकीय पथके आणि औषधांची किट उपलब्ध करुन दिली आहेत. पूरग्रस्त व जोखीमग्रस्त गावातील पाणी नमुने तपासणी करणे, आरोग्य सेवकांच्या घरोघरी भेटी यासह विहिरींमध्ये ब्लिचिंग पावडर टाकून ते स्वच्छ करणे अशा प्रकारचे कार्यक्रम राबविले जात आहेत.

आरोग्य विभागाकडून जाहीर केलेली जोखीमग्रस्त गावे : पेवे, पणदेरी, अडखळ, निगडी, केंगवळ, गोठे, टाकेडे, सार्पिली, कशेडी, सुमारगड, पाचेरी सडा, कुडली, तोंडली, पातेपीलवली, वीर, धामणवणे, पुर्ये, पीरधामपूर, कुरंग, कोंडगे, विलवडे, माचाळ, चिंचुरटी, कोलधे, मोगरे, तिवरे, कार्जिडा.
नदीकाठची गावे : सुसेरी, खेड बाजारपेठ, तवसाळ, पडवे, मजरेकाशी, कुटरे, चिपळूण शहर, नावडी बाजारपेठ, कुरधुंडा, वांद्री, कोळंबे, डिंगणी, फुणगुस बाजारपेठ, करजुवे, हरचेरी, टेंभ्ये, तोणदे, सोमेश्‍वर, हातीस, चांदेराई, निवसर, साटवली, राजापूर शहर, सोगमवाडी, गोवळ, शिवणे, दसुर.
साथ उद्रेक ग्रस्त गावे : हर्णे, पाज, खेड शहर, मुसाड, सवेणी, कोसबी, कातळवाडी, टेरव, डेरवण, खानू, जयगड, सोलगाव.