प्रशासन देखील सज्ज; एनडीआरएफ पथकाला पाचारण
रत्नागिरी:- अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. वादळाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. सावधानता म्हणून तीन जिल्ह्यांसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. 3 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीवर वादळाचे पडसाद दिसून येतील तसेच ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात सध्या दोन वादळांची निर्मिती झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. एक वादळ आफ्रीकेच्या तटावरुन ओमानमार्गे पुढे येमेनच्या दिशेने सरकणार आहे. तर दुसरे वादळ भारताच्या दिशेने सरकत आहे. रविवारीपासून या वादळाचे परिणाम दिसून आले. रविवारपासून जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सारी तर काही वेळाने मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट देखील होता.
अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवली होती. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी हलके वार वाहत होते. काही ठिकाणी हलका पाऊस झाला. अरबी समुद्रात तयार झालेले वादळ महाराष्ट्र, गुजरात किनारपट्टीवर 3 जूनला धडकेल अशी शक्यता आहे. या वादळाचा दिशा पाहता सर्वाधिक फटका रायगड, मुंबई जिल्ह्यांना बसू शकतो. रत्नागिरी, सिंधुुदुर्ग मध्ये किनारी भागात वेगवान वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि किनारपट्टी वरील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. फयान वादळाची तिव्रता लक्षात घेऊन राज्य शासनाने किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या 26 जवानांचे पथक चिपळूण येथे ठेवण्यात आले आहे. या पथकाचे अधिकार्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चाही केली. वादळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाला आहे. फयानमध्ये राबविलेल्या यंत्रणेची माहिती एकत्रित करण्यात आली आहे. त्यानुसार यंत्रणांना सुचनाही दिल्या गेल्या आहेत. वेगवान वार्यांमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत.
मॉन्सुनचा प्रवास सुरु झाला असून केरळमध्ये इंट्री झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कोकणात मॉन्सुनचा प्रवेश होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.