शहरातील रस्ते तत्काळ डांबराने बुजवा: मिलिंद कीर

रत्नागिरी:- शहरातील रस्ते दुरुस्तीसह रस्त्यातील खड्डे डांबराने बुजविण्याची आवश्यकता आहे असे असताना पालिकेकडून अद्याप डांबराने खड्डे भरण्याचे काम केलेले दिसून येत नाही. पावसामध्ये असलेले खड्डे मोठे झाल्यास रस्ते खड्डेमय होण्यास वेळ लागणार नाही. त्याचा नाहक त्रास शहरवासियांना सहन करावा लागतो. त्यामुळे पालिकेने खड्डे भरण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते मिलिंद कीर यांनी पालिका मुख्यधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पालिकेमार्फत दरवर्षी  नगराध्यक्ष ५८/२ चा वापर करुन खड्डे भरण्याचे टेंडर काढतात. अशाप्रकारचे टेंडर काढणे म्हणजे संगनमताने भ्रष्टाचार केल्यासारखे आहे, असे केल्यास आम्ही न्यायालयात दाद मागू असा इशारा मिलिंद कीर यांनी दिला आहे.

तर गटार, नाले, वहाळ, पर्ये साफ करण्याची आवश्यकता आहे. ते काम संथगतीने सुरु आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करावे. पावसाळ्यात शहरवासियांना अडचणींचा सामना करावा लागल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेची राहिल असेही त्यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष निलेश भोसले, बहुजन समाज पार्टीचे अनिकेत पवार आदी उपस्थित होते.