पावसाळ्यातील आपत्तीसाठी रनपची विशेष खबरदारी; दोन स्वतंत्र टीम तैनात राहणार

रत्नागिरी:- पावसापूर्वीची तयारीसाठी पालिका सज्ज झाली आहे. नाले सफाईपासून कुठे पाणी भरल्यास नागरिकांच्या फोनवर ती समस्या सोडविण्याची तयारी पालिकेने केली आहे. अतिवृष्टी किंवा वादळामुळे झाडे, फांद्या, विद्युत खांब पडल्यास ते तत्काळ हटविण्यासाठी दोन टीम तैनात केल्या आहेत. एक दिवसा तर एक टीम रात्रीचीही काम करणार आहे. दोन कटर, दोन जेसीबी, दोन ट्रॅक्टर त्यांच्या दिमतीला असणार आहेत. पावसात नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची तयारी पालिकेने केली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली. 

आगामी पावसाळी हंगामाच्या पार्श्‍वभुमीवर आज पाणी, आरोग्य व स्वच्छता समितीची बैठक घेण्यात आली. यामध्ये हे महत्वाच निर्णय घेण्यात आले. यावेळी पाणी सभापती विकास पाटील, आरोग्य सभापती राजन शेट्ये यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. 
ते म्हणाले,पावसापूर्वीची नाले सफाईची कामे आम्ही यापूर्वीच हाती घेतली आहेत. स्वच्छतेवर भर दिला आहे. तिन्ही पर्‍यांची स्वच्छता झाली आहे. तरी अतिवृष्टी झाल्यास शहरात पाणी भरते. भविष्यात असा प्रश्‍न निर्माण झाल्यास तत्काळ स्वच्छता निरीक्षकांनी दखल घेऊन ती सोडवायची आहे. त्यासाठी निरीक्षकांना फोन केल्यास स्वच्छता कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन नागरिकांची समस्या दूर करतील. शहरात पाणी भरणार नाही, याची तयारी आम्ही केली आहे. 
एवढेच नाही, तर वादळी वारा किंवा अतिवृष्टी झाल्यास झाडे उन्मळून पडणे, फांद्या मोडणे असे प्रकार घडतात. ही नैसर्गिक आपत्ती दूर करण्यासाठी पालिकेने दोन टीम तयार केल्या आहेत. एक टीम दिवसा तर दुसरी टीम रात्रीच्या पाळीला असणार आहे. दोन जेसीबी, दोन कटर, दोन ट्रॅक्टर या टीमच्या मदतीली असणार आहेत. झाड, फांद्या, विद्युत खांब रस्त्यात, घरावर पडल्यास ते हटविण्याचे काम ही टीम करणार आहे. एकूणच पालिकेने पावसापूर्वीची सर्व तयारी केली आहे, अशी माहिती बंड्या साळवी यांनी दिली.