रत्नागिरी:- रत्नागिरीत नवे कोविड रूग्णालय कुवारबांव परिसरात सुरू झाले असून सामाजिक न्याय भवन येथे हे नवीन रूग्णालय सुरू झाले आहे. शनिवारी सायंकाळी काही कोरोनाबाधित रूग्णांची रवानगी या नव्या रूग्णालयात करण्यात आली.
जिल्हा शासकीय रूग्णालय हे कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे रूग्णालयातील इतर सर्व विभाग बाहेर खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. जिल्हा रूग्णालयात केवळ कोविड रूग्णांवर उपचार होत आहेत. आता तर कोरोनाबाधित रूग्णांची संख्यादेखील वाढू लागली आहे. संस्थात्मक क्वारंटाईन व्यक्तीदेखील या रूग्णालयात ठेवले जात आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना नव्या कोविड रूग्णालयाची संकल्पना अंमलात आणण्यात आली. मात्र हे नवीन कोविड रूग्णालय कोठे सुरू करायचे? असा प्रश्न असतानाच सामाजिक न्याय भवन इमारतीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी जिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्यांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली होती.
येथील एका इमारतीत हे कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. इमारतीची साफसफाई, स्वच्छता व इतर बाबींची पूर्तता करून रूग्णालय सुरू करण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत आजच्या आज हे रूग्णालय सुरू व्हावे असा फतवाच जिल्हा प्रशासनाने दिला होता. त्यामुळे या परिसरात मोठी लगबग पहायला मिळत होती.कोरोनाबाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटॅगरी केली जाते. जे रूग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रूग्णांचे अहवाल कोरोनाबाधित येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे अशा रूग्णांना या नवीन कोविड रूग्णालयात दाखल केले जाणार आहे.या नव्या कोविड रूग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून चार स्टाफ नर्स या रूग्णालयात नियुक्त केल्या आहेत. तसेच अन्य स्टाफदेखील तात्काळ दिला आहे. सायंकाळी उशीरा काही रूग्णांना या नव्या कोविड रूग्णालयात भरती करण्यात आले.