रत्नागिरी:- अखेर शहराला नियमित पाणी पुरवठा करण्याचा मुहुर्त निश्चित झाला आहे. नवीन मुख्य जलवाहिनीच्या चाचणीपासून या कामात अनेक विघ्न येत होती. चाचणीवेळीच मुख्य जलवाहिनीला गळती लागली. नंतर जुनी आणि नवीन वाहिनी एकत्र जोडलेल्या ठिकाणी पाईप फुटला, 300 अश्वशक्तीचा विद्युत पंप बसविल्यानंतर पुन्हा जलवाहिनी फुटली. पाठोपाठ येणार्या या समस्येमुळे नियमित पाणी पुरविण्यावर पाणी फेरले होते. मात्र यावर मात करत उद्यापासून (ता. 2) शहराला नियमित पाणी पुरवठा केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यांची नवीन जलवाहिनीची चाचणी करण्यात आली. परंतु चाचणीवेळी एका ठिकाणी पुन्हा गळती लागली. त्यामुळे तो मुहुर्त टळला. पाणी विभागाने जुनी आणि नवीन दोन्ही जलवाहिन्या सुरू ठेवण्याची शक्कल लढविली आहे. एखादी वाहिनी फुटली तर त्याला हा पर्याय आहे. मात्र ज्या ठिकाणी जोडली त्याच ठिकाणी पुन्हा ही वाहिनी फुटली. पुन्हा नियमित पाणी पुरवठ्याचे काम पुढे गेले. त्यानंतर 250 अश्वशक्तीचा पंप बदलून 300 अश्वशक्तीचा पंप हसवण्यात आला. त्यामुळे पाण्याच्या टाक्या लवकर भरू लागल्या. मात्र पाण्याचा दाब वाढल्याने पुन्हा जलवाहिनी फुटली. वारंवार वाहिनी फुटू लागल्याने नियमित पाणी पुरवठा करण्याची योजना मागे पडली होती. मात्र पालिकेने या सर्व समस्यांवर मात करीत सुरळीत पाणी पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे उद्यापासून शहराला नियमित पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले.