रत्नागिरी:- रविवारी सायंकाळपासून सुरू झालेला मान्सूनपूर्व पाऊस पुढील दोन दिवस मुक्कामी असणार आहे. 2 जून पर्यंत वादळी पाऊस कोसळणार असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारी सायंकाळपासून जिल्हाभरात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला हलक्या सारी तर काही वेळाने मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसासह ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट देखील होता. अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने दाणादाण उडवली.
परंतु पावसाचा रुद्रावतार पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 1 आणि 2 जून पर्यंत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसासोबत वादळी वारे वाहतील. तसेच ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट देखील असतील अशी शक्यता आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये आणि किनारपट्टीवरील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.