मासेमारी हंगाम संपुष्टात; 61 दिवसांचा बंदी कालावधी

रत्नागिरी:- वातावरणाच्या तडाख्यात सापडलेल्या मच्छीमारांना यंदाच्या हंगामात शेवटपर्यंत अडचणींचा सामना करावा लागला. शेवटच्या टप्प्यात कोरोनाच्या टाळेबंदीने मच्छीमारांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली. शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून (ता. 1) मासेमारी बंदी कालावधी सुरु झाला आहे. त्यामुळे मच्छीमारी थांबली आहे. बहूतांश नौका किनार्‍यावर उभ्या करण्यात आल्या असून नेपाळी व कर्नाटकी खलाशी घरच्या प्रवासाला लागले आहेत.

जिल्ह्यात बुरोंडी, दाभोळ, मिरकरवाडा, हर्णै या प्रमुख बंदरासह मच्छी उतरवण्याची 27 केंद्र आहेत. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा हंगाम सुरु झाला तेव्हाच निसर्गाने मच्छीमारांना तडाखा दिला. पाऊस लांबल्यामुळे टप्प्याटप्प्याने चक्रीवादळ निर्माण होत होती. हवामान खराब झाल्यामुळे मासेमारी ठप्प होत होती. काही मच्छीमार जीव धोक्यात घालूनही समुद्रात जाण्याचे धाडस करत होते. डिसेंबरला पर्ससिननेट मासेमारी थांबली. चार महिन्यातील अडीच महिने यामध्ये वाया गेले. पुढे फिशींग, गिलनेट, ट्रॉलर्स यांच्याद्वारे मासेमारी सुरु होती. त्यातही पारंपरिक विरुध्द पर्ससिननेट असा वाद सुरुच होता. यंदा बांगडा, काप, गेदर, म्हाकुळ, कोकेर, बला, कोळंबी यासारखी मासळी बर्‍यापैकी मिळत होती; मात्र पापलेट, सुरमई हे मासे किरकोळ प्रमाणात मिळत होते.

जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात निसर्गाच्या तांडवातून सावरणार्‍या मच्छीमारांना मार्च महिन्यात कोरोनाने गाठले. 24 मार्चला टाळेबंदी सुरु झाल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांहून अधिक काळ मासेमारी व्यावसाय पूर्णतः ठप्प होता. त्या कालावधी शेकडो कोटीची नुकसान सहन करावे लागले. उत्पन्न शुन्य आणि खर्च अधिक अशी परिस्थिती त्या कालावधीत मच्छीमारांची होती. शासनाने मासेमारी सुरु केली; परंतु टाळेबंदीच्या कालावधीतील खर्च भरुन काढताना मच्छीमारांनी नाकीदम आली होती. 31 मे रोजी मासेमारी हंगाम संपुष्टात आला. केंद्र सरकारने त्यांच्या हद्दीत 15 जुनपर्यंत मासेमारी सुरु ठेवावी अशी सुचना काढली आहे; परंतु राज्य शासनाने मासेमारी बंदीची सुचना काढल्यामुळे बहूतांश मच्छीमारांनी पॅकअप केले आहे. बहूतांश नौका किनार्‍यावर उभ्या करुन ठेवण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे नौकांवर काम करणारे नेपाळी, कर्नाटकी खलाशी परतीसाठी उत्सूक होते. ते परतीला लागल्यामुळे दोन दिवस आधीपासून मच्छीमारांनी आवरते घेण्यास सुरवात केली होती. बंदरावरील गर्दी थांबली आहे.

वातावरणातील बदल आणि कोरोनामुळे यंदाचा हंगाम निराशाजनक ठरला. कामगारांचे पगार भागवताना मच्छीमारांना कसरत करावी लागली. यंदा पुर्णतः व्यावसाय तोट्यात आहे. त्यावर मोलमजुरी करणारेही अडचणीत आले आहेत.- पुष्कर भुते, मच्छीमार