रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या नऊवर पोचली आहे. दापोली येथील एकाचा 29 मे रोजी मृत्यू झाला होता तर अन्य एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या दोन्ही रुग्णांचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटीव्ह आला असून यामुळे कोरोना बळींची संख्या नऊवर पोचली आहे.
जिल्ह्यात हळूहळू कोरोनाचा फैलाव वाढू लागला आहे. संशयित रुग्ण सापडण्यासह रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढत आहे. नव्याने कोरोना बाधित तीन रुग्णांचे बळी गेले असल्याचे समोर आले आहे.
दापोली येथील मृत व्यक्ती २१ मे रोजी मुंबईतून दापोली येथे आला होता. मुळचा सारंग दापोली येथील असलेला हा वृद्ध २२ रोजी आपल्या गावी दाखल झाला. मात्र त्यांना त्रास सुरु झाल्याने ते २७ मे रोजी रात्री ११.३० वाजता दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रातोरात जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. 29 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला असून त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अन्य एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून त्याचा अहवालही पाॅझिटीव्ह आला आहे.