जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाची वर्दी

रत्नागिरी:- रविवारी सायंकाळी रत्नागिरीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. सायंकाळी चार वाजता ढग दाटून येण्यास सुरुवात झाली आणि अवघ्या काही मिनिटातच रत्नागिरी शहरासह संपूर्ण भागाला पावसाने झोडपून काढले. सुरुवातीला हलक्या सरींनी कोसळणाऱ्या पावसाने नंतर जोर धरला.
 

रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. पावसाची वर्दी मिळताच शहरी भागासह ग्रामीण भागात लाईट गुल झाली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून कोकण किनारपट्टीवर वादळाची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. पावसासोबत सोसाट्याचा वारा देखील वाहत होता.हळूहळू वाऱ्याने वेग पकडला. शहरासह ग्रामीण भागातील लाईट गायब झाली होती. काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. पुढील काही दिवस मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता आहे.