कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच : ना. उदय सामंत

रत्नागिरी :-  कोरोना मृतांवर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्याला होणाऱ्या विरोधामुळे वातावरण चांगलेच तापू लागले होते. हा विरोध म्हणजे रत्नागिरीकरांच्या वैचारिक संस्कृतीला गालबोट असल्याचे मत अनेक सुजाण नागरिकांनी व्यक्त केले होते. अखेर ना. उदय सामंत यांनी यात लक्ष घातले असून कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच करण्याचा निर्णय घेतला आहे.
 

मागील काही दिवस कोरोना बाधित रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराचा प्रश्न निर्माण होत होता. शहरात विरोध आणि स्थानिक गावात देखील विरोध होऊ लागल्याने मोठी समस्याच निर्माण झाली. या विरोधामुळे मृत व्यक्तीचे शव अनेक तास ताटकळत पडल्याचे समोर आले. 

या पार्श्वभूमीवर रविवारी रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि आरोग्य सभापती राजन शेट्ये यांच्या समवेत ना. सामंत यांनी बैठक घेतली. यापुढे कोरोना बाधित मृतांचे अंत्यसंस्कार शासकीय नियमांप्रमाणे रत्नागिरी येथील स्मशानभूमीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी याठिकाणी काही वेगळी रचना करण्यात येणार आहे. यामुळे या वादावर आता पडदा पडल्याचे दिसत आहे. कोरोना बधितांचे अंत्यसंस्कार केल्याने त्याच्या धुरातून व राखेतून कोणताही संसर्ग होत नाही असेही सर्व डॉक्टरांचे म्हणणे आहे.