रत्नागिरी:- बळीराजाला मोसमी पावसाचे वेध लागले असून शेतीची प्राथमिक कामे सुरु झाली आहेत. त्यासाठी शेतकर्यांना साहित्यासह बियाणे, खते यांची कमतरता भासू नये म्हणून रत्नागिरी तालुका कृषी विभागाकडून थेट शेतकर्यांपर्यंत पोचण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत तालुक्यात 162 मेट्रीक टन खत व 120.30 क्विंटल बियाणे 2,853 शेतकर्यांना वाटप केले आहे.
कोरोनामुळे वाहतूक यंत्रणेवर मोठा परिणाम झाला असून शेतकर्यांना बियाणे, खते खरेदीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. रोहीणी नक्षत्र नुकतेच सुरु झाले आहे. मोसमी पाऊस जुनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांकडून भाजावळीस मशागतीची कामे पूर्ण करण्यात येत आहेत. काही ठिकाणी धुळपेरण्याही करण्यात आलेल्या आहेत. त्यांना मोसमी पूर्व पावसाची प्रतिक्षा आहे. बहूतांश शेतकरी हे जूनमध्ये पाऊस सुरु झाल्यानंतर पेरणीला सुरवात करतात. यंदा कोरोनामुळे खताचा पुरवठा वेळेत होऊ शकला नव्हता. बियाण्यांसाठीही शेतकर्यांची घालमेल होती; परंतु कृषी विभागाकडून शेतकर्यांना त्यांच्या घराजवळ जाऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या सुचना शासनाने दिल्या होत्या. त्याचे तंतोतंत पालन तालुकास्तरावर केले जात आहे. त्यात रत्नागिरी तालुक्याने मंडळनिहाय वाटप सुरु केले आहे.
हातखंबा येथील मंडळात कृषीचे अधिकारी श्री. काळोखे, श्री. डवरी, कुरांगले यांच्या मागदर्शनाखाली काम सुरु आहे. पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांच्या हस्ते शेतकर्यांना बियाणे, खते वाटप झाले. या मंडळात आतापर्यंत 23.80 क्विंटल बियाणे आणि 33.90 टन खताचे वाटप झाले आहे. याबरोबरच संपूर्ण तालुक्यात पावणेतीन हजाराहून अधिक शेतकर्यांच्या बांधावर कृषी विभागाचे अधिकारी पोचले आहेत. शेतीसाठी आवश्यक साहित्यही मिळवून देण्यासाठी कृषी विभागाने कंबर कसली आहे. अनुदानासाठी आलेले प्रस्ताव तत्काळ मंजूर केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या टाळेबंदीतही शेतकरी राजा आपल्या नियमित कामांसाठी सज्ज झाला आहे.