रत्नागिरी:- बाजार समितीच्या काजू बी तारण योजनेंतर्गत किलोचा दर 56 रुपये असल्यामुळे यंदा मे महिना उजाडला तरीही शेतकर्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे यंदा शेतकर्यांकडील काजू बीचे दर घसरले आहेत. योजना जाहीर झाल्यानंतर पंधरा दिवसात सात टन काजू बी तारणापोटी बाजार समितीमध्ये दाखल झाली आहे. अजून दहा प्रस्ताव आले असून ते लवकरच मंजूर करण्यात येणार आहेत.
गतवर्षीप्रमाणे हवामानातील बदलामुळे काजू उत्पादनावरही परिणाम झाला आहे. उत्पादन कमी असल्याने दरही सुरूवातीपासून कमी राहिले. त्यात कोरोनामुळे काजू खरेदी करण्यासाठी व्यापारीच पुढे सरसावले नव्हते. या परिस्थितीत रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे सलग तिसर्या वर्षी शेतमाल तारण योजनेंतर्गत काजू बी घेण्यास सुरवात केली आहे. यंदा एक कोटीचे लक्ष्य उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यात 91 हजार 530 हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड करण्यात आली असून पैकी 83 हजार 292 हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. काजूचे उत्पादन कमी असताना लॉकडाऊनमुळे काजूला उठाव नाही, शिवाय दरही कमी आहे. यंदा बाजारभाव कमी असल्यामुळे तारण कर्जाचा दर किलोला 56 रूपये ठेवण्यात आला आहे. निकषानूसार काजू बी चा बाजार भाव 75 रूपये असून त्याच्या 75 टक्के दर तारण कर्जासाठी आकारला जातो.
गेली दोन वर्षात 80 ते 100 रुपये दर किलोमागे होता. त्याचा फायदा शेतकर्यांना चांगल्याप्रकारे उठवता आला होता. ुजुलै महिन्यात चांगला दरही शेतकर्यांना मिळाला. यंदा परिस्थिती उलट झाली असून टाळेबंदीमुळे शेतकर्यांना रोख करमेची नितांत गरज आहे; परंतु तारण योजनेत सध्या मिळत असलेला दर अत्यंत कमी असल्यामुळे तिकडे प्रतिसाद अत्यल्प आहे. तारण योजना जाहीर करुन दोन आठवडे उलटले आहेत. तरीही एकच प्रस्ताव मंजूर झाला आहे. 7 टन बीसाठी 3 लाख 92 हजार रुपये संबंधित शेतकर्याला देण्यात आले आहेत. ही काजू बी राजापूर येथील शेतकर्याने ठेवली आहे. बाजार समितीकडे अजून दहा प्रस्ताव आले असून त्यांना लवकरच मंजूरी दिली जाणार आहे.
याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय आयरे म्हणाले की, पणनच्या सहकार्याने राबविण्यात येणार्या काजू बी तारण योजनेची सुरवात झाली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकर्यांची काजू बी विकली जात नाही. कमी दर मिळत आहे. शेतकर्यांनी नुकसान होवू नये यासाठी बाजारसमितीकडे तारण स्वरुपात ठेवावी. योग्य वेळ पाहून त्याची विक्री झाली तर दर चांगला मिळू शकतो.