दापोलीत गरोदर महिलेसह तिघे कोरोना बाधित; तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 26 वर

दापोली :- तालुक्यातील एका ९ महिन्याच्या गरोदर महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. खबरदारीचा म्हणून त्या महिलेला रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे. दापोली तालुक्यात 23 कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत आणखीन 3 रूग्णांची भर पडल्याने दापोलीतील कोरोनाबाधीतांचा आकडा 26 वर पोहोचला आहे.

या महिलेच्या प्रवासाचा इतिहास मुंबई आहे. ही महिला मुंबईतून १८ तारखेला आपल्या गावी आली होती.ही महिला गरोदर असल्याने नियमित तपासणीसाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आली होती. मात्र, तिच्यामध्ये लक्षणे जाणवू लागल्याने २६ मे रोजी तिचे स्वॅब घेण्यात आले होते. २८ मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रात्री तिला गावातून नेण्यात आले आहे.


ही महिला नऊ महिन्यांची गरोदर असल्याने तिची विशेष काळजी घेण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशानुसार तिला रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. त्याठिकाणी एका स्वतंत्र खोलीत तिची देखभाल केले जाणार आहे. तसेच तिच्यासोबत तिच्या एका नातेवाईकाला सुद्धा राहण्याची परवानगी देण्यात येणार आहे. त्या महिलेचा प्रसुती कालावधी जवळ आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

दापोली तालुक्यातील खेर्डी देवके व केळशी या तीन गावांमध्ये १६ ते १८ मे यादरम्यान मुंबईतून आलेल्या तिघांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वॅब घेतले होते. तसेच गावातील ग्राम कृती दलाने सुद्धा त्यांची खबर आरोग्य विभागाला दिली होती. त्यामुळेच त्यांचे स्वॅबचे नमुने घेण्यास मोठी मदत झाली.