जिल्ह्यात 24 तासांत 48 कोरोना बाधित; एकूण रुग्णसंख्या 256 वर

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. शुक्रवारी रात्री नवे 26 रुग्ण आढळल्यानंतर आज संध्याकाळी आणखी 22 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 256 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जिल्ह्यात कोरोनाने सहावा बळी घेतला आहे.

मुंबई प्रवासाला इतिहास असणारा या कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 256 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार असून शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची संख्या 100795 आहे. येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.

नव्याने आढळलेले 22 रुग्णांमध्ये रत्नागिरितील 8, संगमेश्वर 6 आणि कामथे येथील 8 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात अजूनही 329 अहवाल प्रलंबित आहेत त्यामुळे अजूनही कोरोना बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.