रत्नागिरी:- आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, कोरोना बाधितांशी नाही, ही शासनाची जाहिरात आता नावापुरती उरली आहे. प्रत्यक्षात कोरोनाबाधितांशी लढण्याचे काम सुरू आहे. आज पुन्हा तालुक्यातील देवूड येथील कोरोनाबाधित मृतावर रत्नागिरीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध झाला. प्रशासनदेखील यावर मूग गिळून आहे. फक्त बैठका होत आहेत, मात्र त्यावर निर्णय किंवा उपाययोजना दिसत नाहीत. यावरून संवेदना आणि माणुसकी हरवत चालल्याचे दिसत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधिताचा आज सकाळी मृत्यू झाला. तालुक्यातील हा रुग्ण होता. 18 मे ला ते मुंबईहून आले होते. 22 तारखेला त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. रुग्णालयात मृत्यू झाला तर शासनाच्या नियमानुसार जवळच्या स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसात तीन मृतांचा अंत्यविधी रत्नागिरीत करण्यास विरोध झाला. बाधितांचा मृतदेह घेऊन त्याच्या गावी न्यावा लागला. कोरोना संसर्ग वाढण्यास या गोष्टीदेखील कारणीभूत आहेत. आज त्या बाधिताचा अंत्यविधी चर्मालयात करण्यास विरोध झाला. स्थानिक नगरसेवक व शहरातील लोकप्रतिनिधींनी मृतदेह शहरातील चर्मालय स्मशानभूमीमध्ये दहन करण्यास विरोध केला. यावरून तो मृतदेह सकाळपासून जिल्हा रुग्णालयात पडून आहे. कोरोनाचा बळी असला तरी समज-गैरसमामुळे मृतदेहाची होणारी विटंबना कोण थांबवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरम्यान, आज सकाळी झालेल्या या घटनेनंतर येथे झालेल्या विरोधामुळे नातेवाईकांनी तो मृतदेह गावी नेऊन त्याचा अंत्यविधी करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने याबाबत नुकतीच बैठक घेतली. बैठकीमध्ये स्वतंत्र विद्युतदाहिनी बसविण्याचा निर्णय झाला. परंतु त्यामध्येही पारंपरिकता आणि भावनांचा विषय पुढे आला. त्यामुळे या निर्णयालाही खो बसला. आता पुन्हा बैठक घेऊन त्यावर जिल्हा प्रशासन निर्णय घेणार आहे. मात्र या जर-तरच्या गोष्टी झाल्या. आतापर्यंतच्या प्रकरणामध्ये जिल्हा प्रशासन मूग गिळून आहे. कोणतीच ठोस भूमिका दिसत नाही. त्यामुळे कोरोना मृतांच्या मृतदेहांची फरपट होताना दिसत आहे.