हल्लेखोर बिबट्याचा मृत्यू; वन अधिकाऱ्यांवरच बिबट्याची झडप

रत्नागिरी:- तालुक्यातील निवळी येथे एका महिलेवर जीवघेणा हल्ला करून झाडावर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा अखेर मृत्यू झाला आहे. वन विभागाच्या अधिकारी आणि गावकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद केलं मात्र उपचारासाठी नेत असताना बिबट्याचा मृत्यू झाला.
 

निवळीतील महिला काजू काढण्यासाठी गेली असता अचानक बिबट्याने हल्ला केला.महिलेने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले. वाडी प्रमुख यशवंत नितोरे व वाडीतील तरुण विशाल गावडे,चेतन गावडे, शैलेश खापरे यांनी तात्काळ पोलिस पाटील यांना कळवले. 

वन विभागाच्या अधिकारी प्रियांका लगड या स्वतः बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या असता बिबट्याने लगड यांच्या पायावर झडप घेतली. यात लगड यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. परंतु तपासणीसाठी नेताना त्या बिबट्याचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या झटक्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.