रत्नागिरी:- रत्नागिरीतील निवळी गावातील शेल्टीवाडी येथे भर दुपारी जखमी बिबट्याने महिलेवर जीवघेणा हल्ला केला. महिलेने बिबट्याच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. हल्ल्यानंतर बिबट्या तेथीलच एका झाडावर जाऊन बसला आहे. या झाडाच्या बाजूला काम करणारे कामगार जीव मुठीत धरून दबा धरून बसले आहेत.
हल्लेखोर बिबट्या जखमी असल्याचे देखील बोलले जात आहे. शुक्रवारी दुपारी या बिबट्याने गावातील गावडे नामक महिलेवर हल्ला केला. ही महिला कामानिमित्त या ठिकाणी गेली होती. जखमी अवस्थेतील बिबट्याने या महिलेवर हल्ला करत तिच्या चेहऱ्यावर झडप घातली. या हल्ल्यात महिलेच्या चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. स्वतः चा जीव वाचवत महिलेने घटनास्थळावरून पळ काढला.
यानंतर बिबट्या नजीकच्या एका झाडावर चढून बसला आहे. या झाडानजिक एक कामगार अडकून पडला असून बिबट्या पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा कामगार तेथे लपून बसला आहे. बिबट्या गावात आल्याची खबर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी रवाना झाले आहेत.