रत्नागिरी:- माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षेतील सामाजिक शास्त्र-2 (भूगोल) व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्या विषयांच्या गुणदानासंदर्भात नुकताच मंडळाने निर्णय घेतला आहे.दहावीची ही परीक्षा 3 ते 23 मार्च 2020 या कालावधीत सुुरु होती.
राज्यात कोरोना आजाराच्या प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 23 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात आलेला सामाजिक शास्त्र पेपर 2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा आणि त्यानंतर होणारा दिव्यांग विदयार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषायांचे पेपर होऊ शकले नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने ती परिक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. सामाजिक शास्त्रे पेपर 2 या विषयाचे गुणदान हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये केले जाईल. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक, अंतर्गत मूल्यमापन किंवा तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून त्याचे रूपांतर गुणांमध्ये करण्यात येईल. या प्रमाणे त्या विषयांच्या परीक्षेसाठी गुणदान करून निकाल जाहीर करण्यात येईल.