जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढवणार

रत्नागिरी:- जिल्ह्यात 27 जूनपर्यंत 960 पर्यंत कोरोना बाधितांची संख्या जाऊ शकते. त्या अनुषंगाने जिल्ह्यात रुग्णांसाठीच्या खाटांची क्षमता वाढविण्याच्या सूचना शासनाने केल्या आहेत. याचे नियोजन करण्यात आले आहे. पालिकेचा दवाखाना आणि महिला रुग्णालय यामध्ये 25 बेडची व्यवस्था केली जाणार आहे. महिला रुग्णालयात 20 अतिदक्षता विभागाच्या बेड असणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

येथील अल्पबचत सभागृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, राज्यात कोरोनाचे संकट अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने तयारी केली आहे. आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आमच्याशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांनी भविष्यात रुग्ण वाढणार असल्याने त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी खाटा वाढविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आदी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पालिकेचे मजगाव येथील पुर्ण झालेल्या दवाखान्याची पाहणी केली. तसेच कोकणातील सर्वांत मोठ्या महिला रुग्णालयाच्या इमारतीचीही पाहणी केली. त्यामध्ये सुमारे 20 आयसियु बेड (अतिदक्षता विभाग) तयार करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासना कामाला लागले आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणीही खासगी रुग्णालय किंवा इमारती घेऊन ही व्यवस्था केली जाणार आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद असे राज्यात 27 जूनपर्यंत कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्याच्या टक्केवारीशी तुलना केली तर जिल्ह्यात 960 एवढे कोरोना बाधित रुग्ण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने आम्ही जादा खाटांची व्यवस्था केली आहे. 

वेगाने हे काम पुर्ण व्हावे, यासाठी पालिकेच्या दवाखाण्याच्या इमारतीची जबाबदारी डॉ. पतोडेकर यांच्याकडे दिली आहे, तर महिला रुग्णालयाची जबाबदारी डॉ. चव्हाण यांच्याकडे दिली आहे. ते या कामकाजावर लक्ष ठेऊन लवकरात लवकर पुर्ण करून घेतील. जिल्ह्यात दीड लाखाच्यावर चाकरमानी येण्याची शक्यता आहे. येणार्‍या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ज्यांच्यात लक्षणे आहेत. त्या संशयितांचे स्वॅब घेतले जातील. अनेकजण बोगस पास घेऊन जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची चौकशी करून त्यांच्यावर करवाई केली जाणार आहे.