रत्नागिरी:- कोविड योध्दा म्हणून गावागावात कार्यरत असलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतीसांनी टाळेबंदीच्या काळाच्या नियमित कामही तेवढ्याच गांभिर्याने केले. जिल्ह्यातील लहान मुले आणि गरोदर माता मिळून 62 हजार 142 जणांना घरपोच पोषण आहार दिला. त्यामुळेच अनेक बालकांची पोषण आहार तुटवड्याने परवड झालेली नाही.
जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. टाळेबंदीमुळे मजूर, गरीब यांच्या पोटा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनलेला आहे. टाळेबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातील अंगणवाडीतील बालके यांना सकस आहार, गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना पोषण आहार मिळेल की नाही ? यावर प्रश्नचिन्हच होते. रत्नागिरी जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागाने चांगली कामगिरी केली आहे. कोरोनाच्या कालावधीत रुग्णांचे सर्व्हेक्षण करण्याची अतिरिक्त जबाबदारीही अंगणवाडीतील सेविका व मदतनीस यांच्यावरच होती. सर्वात मोठी जबाबदारीची भुमिका असतानाही या कोविड यौध्दांनी ग्रामीण भागातील बालदोस्त आणि गरोदर मातांच्या आरोग्याची परवड होऊ दिली नाही. जिल्ह्यात सुमारे सव्वादोन हजार अंगणवाड्या आहेत. 6 महिने ते 9 वर्षे वयोगटातील 35 हजार 181 बालके आहेत. 3 ते 6 वयोगटातील 14 हजार 799 बालके तर 12 हजार 162 गरोदर मातांचा समावेश आहे. या सर्वांना महिला व बालकल्याण विभागातील कर्मचार्यांमार्फत मोफत पोषण आहार दिला जातो; मात्र कोरोनामुळे शाळा, अंगणवाड्या बंद होत्या. तरीही घरपोच पोषण आहार दिल्यामुळे लोकांची गैरसोय झाली नाही. त्यात गहू, मसुर डाळ, चणा, मिरची पावडर, हळदी पावडर, मीठ, सोयाबीन तेल यांचा समावेश आहे. 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील केंद्रात बचतगट, ग्रामसमुदाय, महिला मंडळामाफत गरम व ताजा आहार दिला जातो.
लॉकडाऊनमध्ये एकही बालक, गरोदर महिला आणि स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे. आवश्यक तेवढा पोषण आहार उपलब्ध आहे. हा आहार अंगणवाडी सेविकांमार्फत घरपोच दिला जात आहे. अंगणवाडी सेविकांवर या कामाचा ताण आहे; मात्र अंगणवाडी सेविकांनी हे आव्हान पूर्ण केले असून यामध्ये अंगणवाडी कर्मचार्यांच्या सिंहाचा वाटा आहे, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. ए. आरगे यांनी सांगितले.