शिवसेना आमदाराच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून आलेल्या लोकांमुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. अशातच रत्नागिरीत आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रत्नागिरीच्या जामगे येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हा व्यक्ती कांदिवलीहून जामगेमध्ये आला होता. विशेष म्हणजे हा व्यक्ती शिवसेनेतील एका आमदाराचा वाहनचालक म्हणून काम करत होता. त्यामुळे हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

प्राथमिक माहितीनुसार, या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी कळंबणी येथील जिल्हा रुग्णालायात दाखल करण्यात आले होते. त्याला कोरोना झाल्याचा संशय असल्याने त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.त्यामध्ये या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान, हा व्यक्ती शिवसेना आमदाराचा वाहनचालक असला तरी गेल्या काही दिवसांत या दोघांचा संपर्क झाला नव्हता. लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तो संबंधित आमदाराच्या गाडीवर गेला नव्हता. त्यामुळे शिवसेना आमदाराला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.