रत्नागिरी:- पैशाच्या देवाणघेवाणीतून मित्रांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात परस्परविरोधी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ मे रोजी करबुडे-मूळगाववाडी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार रावसाहेब जगन्नाथ माळी (रा. साईभूमीनगर, जे. के. फाईल्स, रत्नागिरी) यांनी त्यांचा मित्र प्रविण परब व प्रविण परबचा मित्र भिकाजी पांडुरंग सोनवडकर यांची ३ गुंठे जमीन ४ लाख ५० हजार रूपयांना खरेदी करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे माळी यांनी भिकाजी पांडुरंग सोनवडकर यांना प्रविण परब यांच्यासमक्ष २ लाख ५० हजार रूपये दिले होते. त्याबाबत कोणताही कागदोपत्री व्यवहार केलेला नव्हता.
लाखो रूपयांची रक्कम देवूनही कोणत्याही प्रकारची जमीन सोनवडकर यांनी दिली नाही, म्हणून माळी हे सोनवडकर यांच्या करबुडे येथील घरी गेले होते. त्यावेळी जमिनीबाबत विचारणा केली. त्यावेळी सोनवडकर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यावेळी वादावादी होवून सोनवडकर यांनी माळी यांना धकलाबुकल करून मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या जमलेल्या ६ ते ७ लोकांनी लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने माळी यांना मारहाण केली.
याप्रकरणी रावसाहेब माळी यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी भिकाजी पांडुरंग सोनवडकर व अन्य ६ ते ७ अनोळखी व्यक्ती यांच्याविरोधात भादंविक १४३, १४७, १४९, ३२४, ३२३, १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास पोहेकॉ साळवी करीत आहेत.
याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार दाखल झाली असून भिकाजी पांडुरंग सोनवडकर यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन २०१८ मध्ये सोनवडकर यांनी रावसाहेब माळी यांच्याकडून आंबा व्यवसायाकरिता २ लाख ५० हजार रूपये हातउसने घेतले होते. त्यातील काही रक्कम सोनवडकर यांनी रावसाहेब यांचा मित्र प्रविण प्रकाश परब यांच्याकडे माळी यांना देण्याकरिता दिली होती. मात्र ती रक्कम माळी यांना दिली नाही.
यावरून रावसाहेब माळी हे सोनवडकर यांच्या घरी गेले व त्यावेळी पैशाची मागणी केली. पैसे परत देण्याबाबत झालेल्या चर्चेवेळी मी उद्या विचार करून त्याबाबत सांगतो असे सोनवडकर यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बाचाबाचीत माळी यांनी सोनवडकर यांना धकलाबुकल करून हाताच्या थापटाने व लाकडी दांड्याने मारहाण केली. यावेळी सोनवडकर यांची पत्नी मध्ये गेली असता तिलादेखील लाकडी दांड्याने मारहाण केली.
याप्रकरणी भिकाजी पांडुरंग सोनवडकर यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रावसाहेब जगन्नाथ माळी (रा. साईभूमीनगर) व प्रविण प्रकाश परब (रत्नागिरी) यांच्याविरोधात भादंविक ३२४, ३२३, ५०४, ५०६, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ साळवी करीत आहेत.