रत्नागिरी:- एकवेळ ग्रीन झोनकडे वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याने कोरोनाबाधितांच्या संख्येचे द्विशतक पूर्ण केले आहे. काल उशिरा जिल्ह्यात आणखी बाराजण कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 208 वर पोहोचली आहे.
काल नव्याने सापडलेल्या कोरोना बाधितांमध्ये संगमेश्वर तालुक्यात चार जण आहेत त्यातील तिघेजण मेगी गावातील आहेत . चिपळूण तालुक्यातील दोन जण पॉझिटिव्ह असून दोघेही वाघिवरे गावांमधील रहिवासी आहेत . तर दापोली व रत्नागिरी तालुक्यांमध्ये प्रत्येकी तीन पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या अधिक असून गुरुवारी सायंकाळपर्यंत होम क्वारंटाईन केलेल्याची संख्या 90000 हजारांजवळ आहे. येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 208 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामधील 83 कोरोनाबाधित रुग्णांना डिसचार्ज देण्यात आला असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. उपचारात असणार्या ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 120 आहे.