कोरोना चाचणी प्रयोगशाळा उभारण्याच्या हालचाली गतिमान

रत्नागिरी:- कोरोना चाचणी प्रयोगशाळा जिल्ह्याला मंजूर झाल्यानंतर ती उभारण्याच्या दृष्टीने जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मायक्रोबायोलॉजिस्ट, लॅब टेक्निशियन ही कंत्राटी पद्धतीवरील पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 30 तारखेपर्यंत त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. लॅबसाठीच्या अंतर्गत कामांना सुरवात झाली आहे. शासनाला प्रत्येक नमुना तपासणीला लागणारा दीड हजार रुपयाचा खर्च यामुळे वाचणार आहे तसेच तत्काळ अहवाल मिळणार आहे. 

जिल्ह्यात आता कोरोनाबाधितांची संख्या 196 वर गेली आहे. क्वारंटाईन असलेल्यांची संख्या देखील 85 हजार आहे. संशयितांची वाढती संख्या आणि मिरज येथील लॅबवर येणारा ताण यामुळे नमुन्यांचा अहवाल येण्यास विलंब होत आहे. विलंबामुळे संसर्ग रोखण्यास अडचणी येत आहेत. त्यात मिरज येथील लॅबने जिल्ह्यातील नमुने स्वीकारण्यास नकार दिला होता; मात्र शासनाच्या आदेशानुसार पुन्हा मिरज येथेच नमुने तपासणी केली जात आहे. म्हणून जिल्ह्याला स्वतंत्र लॅब मिळावी, ही मागणी रेटून धरण्यात आली होती. त्याला यश आले असून जिल्हा रुग्णालयात लॅब मंजूर झाली आहे. त्यासाठी 1 कोटी 7 लाखाचा निधीही प्राप्त झाला आहे. 

सध्या स्वॅबची मोफत तपासणी केली जाते. एका रुग्णाच्या स्वॅब तपासणीचा खर्च 1500 रुपये आहे तर खासगी रुणालयातील हा खर्च 4 हजार रुपये आहे. स्वॅबची तपासणी 3 प्रकारे केली जाते. तपासणीसाठी एक प्लेट वापरण्यात येते. यावर 97 वेळा नमुने तपासता येतात. त्यानंतर ती प्लेट निकामी होते. या प्लेटची किंमत 1 लाखाच्या आसपास आहे. त्यामुळे प्रत्येक रुणासाठी साधारण हजार रुपये खर्च येतो. ही प्लेट बनविणार्‍या 2 भारतीय कंपन्यां आहेत तर 1 परदेशी कंपनी आहे. स्वॅब तपासणीसाठी किट आवश्यक असते. त्याची किंमत 250 रुपये आहे. रत्नागिरी लॅब सुरू झाल्यानतंर स्वॅब तपासासाठी प्रत्येक रुग्णामागे 1 हजार 500 रुपये खर्च येऊ शकतो. जिल्ह्यातून आतापर्यंत मिरजला पाठवलेल्या स्वॅबची संख्या 6 हजाराच्यावर आहे. लॅब सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून तांत्रिक कर्मचार्‍यांच्या भरतीच्यादृष्टीने जिल्हा रुग्णालयाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.