कोरोनाबाबत ग्रामीण जनतेचे प्रबोधन करा- बाबू म्हाप

रत्नागिरी:- ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाच्या भितीमधून बाहेर काढण्यासाठी प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाकडून पावले उचलली जावीत अशा सुचना आरोग्य सभापती बाबू म्हाप यांनी आरोग्य समितीमध्ये अधिकार्‍यांना दिल्या आहेत.
आरोग्य समितीची बैठक मंगळवारी (ता. 26) सायंकाळी झाली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. मुंबईकर चाकरमानी गावात आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करुन ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर गावात काळजी घेण्यासाठी ग्रामकृतीदलाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांना अनेक चांगले-वाईट अनुभव येत आहेत. त्याबाबत काही सदस्यांनी मतेही मांडली. कोरोनामध्ये गावपातळीवर आरोग्यसह विविध यंत्रणा चांगले करत असल्याचे सर्वांनी सांगितले. ग्रामीण भागातील लोकांमध्ये अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. ग्रामकृतीदल स्वतःची मॉडेल तयार करुन कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर उपाययोजना करत आहेत. त्यामधून अंतर्गत कुरबूरी सुरु आहेत. कृती दलाला गावातील लोकांची काळजी आहे. त्यामुळे त्यांना गावपातळीवर निर्णय घ्यायला दिले जावेत. क्वारंटाईन केलेल्यांकडून तक्रारी आल्या तर त्याची दखल घेतली जावी. अशा सुचना यावेळी म्हाप यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तसेच भविष्यात कोरोनासोबत प्रत्येकाला जगायचे आहे. कोरोनाबाबतची भिती काढून टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना ग्रामपातळीवर कराव्यात असे म्हाप यांनी यावेळी सांगितले.