कोकण किनारपट्टीवर डॉल्फिनच्या गूढ मृत्यूच्या कारणांचा शोध सुरु

रत्नागिरी :- जिल्ह्याच्या किनारपट्टीवर डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. आठवडाभरात दापोलीतील पाळंदे आणि सालदुरे गावच्या किनाऱ्यावर दोन डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळल्याने त्यांच्या मृत्युच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.


कोकणात डॉल्फिनचा मृत्यू चिंतेचा विषय ठरत आहे. आठवडाभरात दोन तर गुहागर आणि दापोलीत दोन महिन्यांत सहा डॉल्फिन माशांचा मृत्यू झाला आहे. या माशांचा मृत्यू कोणत्या व्हायरसमुळे झाला आहे की डॉल्फिन माशांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने मृत्यू होत आहेत याबाबतचा शोध आता घेतला जात आहे.


एकापाठोपाठ एक होणारे डॉल्फिन माशांचे मृत्यू कशामुळे होत आहेत याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे. एका व्हायरसमुळे डॉल्फिनची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्याचाच हा परिणाम होऊन डॉल्फिनचे मृत्यू होत असल्याचा अंदाज रत्नागिरीच्या मत्स्य महाविद्यालयातील प्राध्यापक स्वप्नजा मोहिते यांनी व्यक्त केला आहे.

डॉल्फिनच्या मृत्यूचं कारण अद्याप निश्चित झालेले नाही. जेव्हा मृत डॉल्फिन आढळला तेव्हा कुजलेल्या अवस्थेत होता. परिणामी त्याला तिथेच खड्डा खणून पुरण्यात आले. तर मुरुड, पाळंदे, हर्णे समुद्र किनारी डॉल्फिन पाहाण्यासाठी म्हणून पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. डॉल्फिन सफरसाठी या परिसरतील हर्णे, मुरुड, पाळंदे याठिकाणी खास फायबर फेरी बोटींची देखील व्यवस्था स्थानिकांकडून केलेली आहे. पण त्यांना आता लॉकडाऊनचा फटका बसला आहे. अशा वेळी डॉल्फीनचा मृत्यू सध्या चिंतेचा विषय असून त्यामागची कारणं शोधण्याची गरज आहे.


बोटींच्या धक्क्यामुळे डॉल्फीनचा मृत्यू झाल्याच्या देखील काही घटना याआधी घडलेल्या आहेत. पण, सध्या मासेमारी बंद असल्याने समुद्रात बोटी जातच नाहीत. त्यामुळे या कारणामुळे डॉल्फिनचा मृत्यू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे अन्य कारणामुळेच डॉल्फिन माशांचे मृत्यू वाढले असल्याची शक्यता आहे.