रत्नागिरी :- टाळेबंदीमुळे कुठेही बाहेर पडता येत नसल्यने आरोग्यासह मानसिक कुरबुरींचे मोठे आव्हान सर्वांपुढेच होते. त्यावर मात करण्यासाठी स्वतःबरोबरच आपार्टमेंटमधील सर्वच महिलांचे आरोग्य सुरक्षित रहावे या उद्देशाने रत्नागिरीतील आंतरराष्ट्रीय योगापटू पुर्वा आणि प्राप्ती किनरे भगिनींनी गेले महिनाभर सकाळच्या सत्रात टेरसवर योगाचे धडे देण्याचा उपक्रम राबविला. सोशल डिस्टन्सिंग राखत या भगिनींनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक सगळीकडे होत आहे.
कोरोनाने आरोग्य संपन्न आयुष्याची महती प्रत्येक व्यक्तीला समजली आहे. आरोग्यदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्न करत आहे. लहान वयात योगाचे धडे घेत राज्य, राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर पुर्वा आणि प्राप्ती किनरे यांनी नाव नाव मिळवले. खेळाच्या माध्यमातून सुदृढ आरोग्याचा कित्ता त्यांनी गिरवले. खेळातील ज्ञानाचा उपयोग टाळेबंदीच्या या काळात त्यांनी केला. कोरोनापासून दूर राहण्यासाठी टाळेबंदीत विविध उपाय केले जात आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दोन टप्प्यात नागरिकांना घरातून बाहेर पडणेही अशक्य होते. या परिस्थिती आरोग्याच्या प्रश्नांबरोबरच मानसिक व्याधींचे सर्वांपुढे आव्हान आहे. सुदृढ आरोग्य आणि प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक जणं वेगवेगळे उपाय करत आहेत. त्या योगा हा एक उपाय आहे.
रत्नागिरीतील योगापटू पूर्वा आणि प्राप्ती या दोघीही योगाच्या माध्यमातून स्वतःला आरोग्यदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी प्रयत्न करत होत्या. नियमित सकाळी टेरेसवर योगाचे धडे सुरु होते. किनरे भगिनी मारुतीमंदिर येथील आर्ची कॉम्प्लेक्समध्ये राहतात. त्यांच्याबरोबर योगा करण्यासाठी अपार्टमेंटमधील मुले, महिलांही तयार झाल्या. त्या दोघींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनापासून सकाळी 6 ते 7.30 वाजेपर्यंत प्राणायाम आणि सायंकाळी 6 ते 7.30 विविध आसने दररोज करण्यास सुरवात झाली. या उपक्रमामुळे दिवसभर घरातच राहणार्या त्या महिला व मुलांना चांगला लाभ होत होता. यामध्ये नियमित सुर्यनमस्कार, ताडासन, कटिचक्रासन, सिंहासन, मंडूकासन, उत्तान मंडूकासन, आकर्ण धनुरासन, नौकासन, मेरुदंडासन यासारखी विविध आसने करुन घेतली जात होती.