रत्नागिरी पं. स. गटशिक्षणाधिकाऱ्यांना जि. प. अध्यक्षांकडून दणका

रत्नागिरी:- रत्नागिरी पंचायत समितीमधील शिक्षण विभागात कार्यरत कर्मचार्‍यांचे प्रलंबित प्रश्‍न जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी मार्गी लावले. पगारातून कापून घेतलेली विमा रक्कम कंपनीकडे भरणा करावी आणि त्याचा अहवाल 5 जूनपर्यंत सादर करावा अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत.

रत्नागिरी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या कामकाजाबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्याकडे काहींनी तक्रारी केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि रत्नागिरी गटशिक्षणाधिकारी, संबंधित कर्मचारी यांची बैठक अध्यक्ष रोहन बने यांच्या दालनात झाली. गेल्या काही महिन्यापासून वेतनातून कपात केलेली रक्कम भरणा केल्या जात नाहीत. त्यामुळे विम्याचे कापून घेतलेले हप्ते वेळेत कंपनीकडे भरणा केले गेलेले नाहीत. त्यामुळे त्याचा लाभ संबंधितांना होणार नाही. इतर कर्जांचे हप्ते कापून घेऊन देखील भरणा केलेले नसल्याचे वारंवार निदर्शनास येत होते. याबाबत श्री. बने यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. 5 जूनपर्यंत यावर तोडगा काढला जावा आणि त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना अध्यक्ष बने यांनी दिल्या आहेत. तसेच चटोपाध्याय व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती करण्याची जी प्रकरणे प्रलंबित आहेत ते लवकरात लवकर निकाली काढण्याबाबत सूचना केल्या.