रत्नागिरी:- देवूड येथे क्वारंटाईन असलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर आरोग्य यंत्रणेची चांगलीच धावाधाव सुरू झाली. हा रूग्ण गावातच क्वारंटाईन असल्याने आरोग्य विभागाने देवूड गावात कंटेनमेंट झोन व बफर झोन जाहीर केला आहे. कंटेनमेंट झोनमध्ये चिखलगाव-डुगीवाडी, रेवाळेवाडी, गडीवाडी आदी वाड्या कंटेनमेंट झोन तर देवूड-बौद्धवाडी बफरझोन म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे.
सोमवारी रात्री उशीरा जिल्ह्यात ५ नवे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण मिळून आले. त्यामध्ये रत्नागिरीतील देवूड येथील १ तर गुहागर तालुक्यातील ४ असे मिळून ५ जण कोरोनाचे रूग्ण आढळून आले. तालुक्यातील देवूड येथील ४९ वर्षीय व्यक्ती ही मुंबईतून आली होती. त्यामुळे त्या व्यक्तीला गावातील एका घरात क्वारंटाईन केले होते. रेडझोनमधून ही व्यक्ती आल्याने त्यांची कोरोना टेस्ट केली होती. त्याचा अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाला. या व्यक्तीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरू झाली. ही व्यक्ती अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का? याची माहिती घेण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
तालुका आरोग्य विभागाने देवूड गावातील काही वाड्या सील करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चिखलगाव-डुगीवाडी, रेवाळेवाडी, गडीवाडी आदी वाड्या कंटेनमेंट झोन तर देवूड-बौद्धवाडी बफरझोन म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ज्या घरात या व्यक्तीला क्वारंटाईन केले होते त्या ठिकाणी अन्य चाकरमान्यांनादेखील क्वारंटाईन केले होते. त्यामुळे संपर्कात आलेल्या सर्वांचीच कोरोनाची चाचणी केली जाणार आहे.