रत्नागिरी :- टाळेबंदी आणि कोरोनाची भिती यामुळे अनेक गावांमध्ये खासगी डॉक्टर उपचारासाठी पोचलेले नाहीत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय, भारतीय जैन संघटना आणि फोर्स मोटर्स् यांच्या संयुक्त विद्यमान ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम दहा दिवस राबविला जात आहे. रत्नागिरी तालुक्यात सुमारे 29 शिबीरांचे आयोजन करत सर्दी, तापासह कोरोनामुक्तीसाठीची जनजागृती केली जात आहे. यामध्ये सुमारे सव्वातीन हजार लोकांची तपासणी करण्यात आली.
कोरोनामुळे त्रस्त झालेले अनेक रुग्ण गावात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत. एकीकडे कोरोनाची भिती आणि दुसरीकडे लॉकडाऊनमुळे बाहेर पडणे अशक्य असल्यामुळे द्विधा मनस्थितीत ग्रामस्थ घरातच राहत आहेत. टाळेबंदीच्या काळात सुरु झालेली ही गैरसोय दूर करण्यासाठी जैन संघटनेने सिव्हीलच्या माध्यमातून डॉक्टर आपल्या दारी उपक्रम सुरु केला. यामध्ये सुसज्ज असलेली मोबाइल डिस्पेन्सरी (ओपीडी) व्हॅन या अॅडव्हान्स सेवेच्या माध्यमातून गावागावात जाऊन ताप, सर्दी, खोकला आदी आजारांवर विनामूल्य तपासणी, डॉक्टरांचा सल्ला आणि औषधांचे वितरणही मोफत करण्यात येत आहे.
खेडशी लक्ष्मी नारायण नगर येथे 29 वे आरोग्य शिबीर नुकतेच पार पडले. या शिबीरांचे आयोजन जिल्हा शासकीय रुग्णालय आणि भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स यांनी केले होते. जैन संघटनेतर्फे मुकेश गुंदे स्वतः या शिबिराला उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयातर्फे डॉ. शैलेंद्र पाटील यांनी नागरिकांची तपासणी केली. त्यांना फार्मासिस्ट सिद्धेश पाटोळे आणि परिचारिका प्रियांका पानगले यांनी सहकार्य केले. जैन संघटनेचे महेंद्र गुंदेचा, मुकेश गुंदेचा व मनोज जैन उपस्थित होते. खेडशीतील 186 नागरिकांनी याचा लाभ घेतला. रत्नागिरी शहर आणि जवळच्या ग्रामिण परिसरात जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांच्या सहकार्याने 28 आरोग्य शिबिरे घेण्यात आली. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व शिबिरात मिळून सुमारे 3,213 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 18 ते 25 मे या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभुमीवर हे नियोजन करण्यात येत आहे.
नियमित आजारांबरोबरच या आरोग्य शिबिरात प्रत्येक व्यक्तीला करोनापासून प्रादुर्भाव आणि संरक्षणाची माहिती दिली जात होती. त्याचबरोबर नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कॅल्शियम गोळ्यांचे विनामूल्य वाटप करण्यात आल्याचे मुकेश जैन यांनी खेडशी येथील शिबीरप्रसंगी सांगितले.