जिल्ह्यात 17 हजार ग्रामस्थांना पाणी टंचाईची झळ

रत्नागिरी:- वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यात टंचाईचा आगडोंब दिवसेंदिवस वाढत असून 17 हजार 208 लोकांना त्याची झळ बसत आहे. 63 गावातील 128 वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मागील आठवड्यात उष्मा वाढल्यामुळे पाणीपातळीत मोठी घट झाली आहे. काही ठिकाणी विहिरीही कोरड्या पडल्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.

गेल्या आठवड्यात राज्यामध्ये उष्म्याची लाट आली असून पारा 40 अंश सेल्सिअसवर पोचला होता. कोकणातही तशीच अवस्था आहे. कमाल, किमान तापमान वाढल्यामुळे त्याचे परिणाम दैनंदिन जीवनावर होत आहेत. लांबलेल्या पावसामुळे यंदा टँकरची मागणी पंधरा दिवस उशिराने झाली होती. टंचाईची तिव्रता वाढ होऊ लागली असून सध्या जिल्ह्यात 128 वाड्या अडचणीत आहेत. गेल्या आठवड्यात 48 गावातील 88 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणी पुरवठा होत होता. आठ दिवसांमध्ये 40 वाड्यांची भर पडली आहे. सर्वाधिक टंचाई खेड, चिपळूण, संगमेश्‍वर या तिन तालुक्यांना जाणवत आहे; मात्र रत्नागिरी, गुहागर, राजापूर हे तिने तालुके टँकरमुक्त ठेवण्यात आतापर्यंत यश आले आहे. या तिन्ही तालुक्यांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्यांचे नियोजन करण्यावर त्या-त्या पंचायत समितींनी भर दिला होता. रत्नागिरी एमआयडीसीअंतर्गत येणार्‍या अकरा ग्रामपंचायतींमध्ये आठवड्यातील एक गुरुवारी पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कळझोंडी धरणावर अवलंबून असलेल्या ग्रामपंचायतींचेही पाणी एक दिवसाआड केले आहे. तेथील काही लोकांना खासगी कंपनीकडून पाणी दिले जात आहे.

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानूसार केरळला 5 जूनपर्यंत पाऊस दाखल होणार आहे. त्यानंतर कोकणात मोसमी पावसाचे आगमन होईपर्यंत 10 ते 12 जून येण्याची शक्यता. तोपर्यंत पाणी साठा पुरवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे. शेवटच्या टप्प्यात मोसमी पूर्व किंवा अवकाळी पाऊस पडला तर टंचाईची तिव्रता कमी होइल. अन्यथा टँकरग्रस्त गावांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कालावधीत ही मोठी अडचण असल्याचे चित्र आहे.