घर गाठण्यासाठी परप्रांतीय कामगारांची धडपड; 1 हजार 20 जण रेल्वेने रवाना

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत घर गाठण्यासाठी परप्रांतीय कामगारांनी धडपड सुरू केली आहे. बुधवारी श्रमिक ट्रेन सुटणार असल्याने छत्रपती शिवाजी स्टेडियमवर तब्बल 1700 कामगार जमा झाले होते. मात्र ट्रेनची प्रवासी क्षमता 1 हजार 20 जणांची असल्याने उर्वरित कामगारांना माघारी परतावे लागले. 

लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांनी आपल्या मूळ गावी जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यासाठी दोनवेळा हे कामगार रस्त्यावरदेखील उतरले होते. यापूर्वी तामिळनाडू व अन्य राज्यातील कामगार व विद्यार्थ्यांना श्रमिक ट्रेनने त्यांच्या प्रांतात पाठविण्यात आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी प्रशासनाकडे ५० हजारच्यावर अर्ज आले आहेत. त्यातच परप्रांतीय कामगारदेखील गावी जाण्यासाठी धडपड करीत असताना रेल्वेच्या श्रमिक ट्रेनने टप्प्याटप्प्याने या कामगारांना त्यांच्या प्रांतात पाठविले जात आहे.

बुधवारी सकाळपासून छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर परप्रांतीय कामगारांची लगबग सुरू झाली. बघताबघता अवघ्या तासाभरात ५०० च्या वर परप्रांतीय कामगार मैदानावर दाखल झाले आणि हा आकडा काही वेळात वाढत गेला आणि तो १७०० वर जावून पोहोचला. तब्बल १७०० कामगार आपल्या प्रांतात जाण्यासाठी मैदानात दाखल झाले.
हे कामगार येण्यापूर्वीच पोलीस आणि आरोग्य विभागाची टीम स्टेडियमवर दाखल झाली होती. या कामगारांची नोंदणी करून त्यांची प्राथमिक तपासणीदेखील करण्यात आली होती तर या कामगारांना स्टेशनपर्यंत घेऊन जाण्यासाठी एस्. टी. च्या गाड्या मैदानात तैनात केल्या होत्या. फार मोठी लगबग त्या ठिकाणी पहायला मिळत होती.
लॉकडाऊनमुळे सुमारे दोन महिने जिल्ह्यात अडकून पडलेले हे कामगार आता आपल्या मायभूमीकडे परतण्यासाठी धडपड करीत आहेत. बुधवारी छ. शिवाजी महाराज स्टेडियमवर जमलेल्या या परप्रांतीय कामगारांच्या चेहर्‍यावर वेगळेच भाव पहायला मिळत होते. प्रशासन ज्या सूचना देत होते त्या सूचनांचे पालन या कामगारांकडून तंतोतंत केले जात होते.
श्रमिक ट्रेनमधून जाण्यासाठी सुमारे १७०० कामगार दाखल झाले. मात्र एकावेळी एका ट्रेनमधून केवळ १०२० कामगारच जावू शकतात, अशी अट असल्याने ज्यांचे नंबर आधी लागले त्यांना आपल्या प्रांतात जायची संधी मिळाली. उर्वरितांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला. या उर्वरित कामगारांना माघारी परतावे लागले व पुढील आदेशापर्यंत त्यांना आता वाट पहावी लागणार आहे.