उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत सव्वा लाखांची गावठी दारु जप्त; दोघांना अटक

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावर गावठी हातभट्टीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून १ लाख २६ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची टीम निवळी-जयगड दरम्यान सोमवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना एक अल्टो कार १२ एफ.पी. ७३५७ ही भरधाव वेगाने जाताना दिसून आली.पेट्रोलिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी त्या कारचा पाठलाग केला.चाफे तीठ्यावर ही कार भरारी पथकाने अडवली. त्यावेळी गाडीची तपासणी केली असता कारमध्ये ४० लि. मापाच्या गावठी हातभट्टी दारुने भरलेल्या ७ रबरी टयुब व अंदाजे ३० लि मापाचे प्लॅस्टिकचे ०७ कॅन व अंदाजे २० लि. मापाची एक गावठी हातभट्टी दारुने भरलेली रबरी टयुब अशी एकूण ५१० लि. गावठी हातभट्टी दारु मिळून आली.

लाखो रुपयांची दारू मिळून आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभाच्या भरारी पथकाने कार मधील मिनार रायबा पाटील, रा. मिरजोळे – पाटीलवाडी ता. जि. रत्नागिरी व शुभम सुरेश वरेकर, रा. मजगाव, किर्तीनगर ता. जि. रत्नागिरी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गावठी हातभट्टी दारुची बेकायदेशीरित्या वाहतूक करताना मिळून आल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा १ ९ ४ ९ चे कलम ६५ ( अ ) ( ई ) ८१, ८३ व ९ ० अन्वये गुन्हा नोंद करुन त्यांच्या ताब्यातील गावठी हातभट्टी दारु व वाहनांसह १ लाख २६ हजार ५५० रुपये किंमतीचा दारुबंदी गुन्हयातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
ही कारवाई विभागीय उप- आयुक्त वाय.एम. पवार, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी अधीक्षक, डॉ. बी. एच. तडवी, यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भरारी पथकचे निरीक्षक शरद अंबाजी जाधव, जवान मानस पवार, वैभव सोनावले यांनी केली.