रत्नागिरी:- सुधारित पाणी योजनेतील नवीन मुख्य जलवाहिनीची चाचणी झाली. पाणी सोडण्याचे नियोजन करताना जुन्या आणि नवीन जलवाहिनीचा वापर करता येईल, अशी चावी बसविण्यात आली आहे. चाचणीनंतर ज्या ठिकाणी ही चावी बसवण्यात आली त्याच ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने गळतीमुळे नियमित पाणी पुरवठ्याला खो बसला आहे. मंगळवारी दिवसभर त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. गुरुवारपासून शहराला नियमित पाणी पुरवठा होेईल, असे नगराध्यक्ष बंड्या साळवी आणि पाणी सभापती विकास पाटील यांनी सांगितले.
शीळ ते साळवी स्टॉप येथील जलशुद्धिकरण केंद्रापर्यंत टाकण्यात आलेेली मुख्य जलवाहिनी जीर्ण झाल्याने 51 टक्के गळती होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते. शीळ धरणातून उचलले जाणारे बारा ते चौदा एमएलडी पाण्यापैकी 51 टक्के पाणी वाया जात होते. त्यामुळे सुधारित पाणी योजनेतून पर्यायी नवीन मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गळतीमुळे शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई भासत आहे. म्हणून अडीच महिन्यांपूर्वीच दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला आहे. ज्या ठिकाणी टंचाई भासत आहे. तेथे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नवीन जलवाहिनी विमानतळाजवळ जुन्या जलवाहिनीला जोडण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी (ता.24) तारखेला उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत याच्या हस्ते नवीन जलवाहिनीच्या चाचणीचा शुभारंभ करण्यात आला. मात्र शुभारंभ झाल्यानंतर एका ठिकाणी किरकोळ गळती होती. 51 टक्के गळती निघाल्याचा दावा श्री. सामंत यांनी यावेळ केला होता.
मात्र त्यानंतर एका महत्त्वाच्या ठिकाणी जलवाहिनी फुटली. पालिकेने जुनी जलवाहिनीही तशीच ठेवली आहे. काही अडचण आल्यास वेळ प्रसंगी नव्या किंवा जुन्या जलवाहिनीवरून पाणी पुरवठा करता येईल, अशी जॅकवेल येथे व्यवस्था केली आहे. नवीन जलवाहिनी फुटल्यास जुन्या वाहिनीवरून पाणी सोडण्यासाठी चावी बसविण्यात आली आहे. या चावीच्या ठिकाणी पाईप फुटल्याने मोठी गळती लागल्याने नियमित पाणी पुरवठ्याला खो बसला आहे. आज दिवसभर पालिकेच्या पाणी विभागामार्फत दुरूस्ती सुरू आहे. नगराध्यक्ष बंड्या साळवी, पाणी सभापती विकास पाटील हे जातीनिशी हजर राहून हे काम करून घेतले आहे. उद्या त्याची पुन्हा चाचणी होऊन गुरूवार पासून दिवसाआड नाही, तर नियमीत पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.