रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील नरबे तर संगमेश्वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरूख आणि पांगरी ही गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहेत. काही दिवसांपूर्वीच या गावांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण मिळून आले होते.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून जिल्हावासीयांची चिंता अधिकच वाढली आहे. दरदिवशी कोरोनाबाधित रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह येत असल्याने कोरोनामुक्त झालेला जिल्हा आता कोरोनाग्रस्त होण्याच्या मार्गावर आला आहे. सोमवारी रात्री ५ रूग्ण कोरोनाबाधित मिळून आले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील देवूड येथील १ तर गुहागर तालुक्यातील पांगरी तर्फे वेळंब, वेळंब, बारगोडेवाडी गुहागर आदी ठिकाणी कोरोनाबाधित रूग्ण मिळून आले. या सर्वांना यापूर्वीच क्वारंटाईन केले होते.
यापूर्वी रत्नागिरी तालुक्यातील नरबे संगमेश्वर तालुक्यातील परचुरी, निवे बुद्रुक, मानसकोंड, वांझोळे, वाशी तर्फे देवरूख आणि पांगरी या गावांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण मिळून आले होते. सर्वजण मुंबई रिटर्न होते. त्यातच वाशीतर्फे देवरूख येथील कोरोनाबाधित रूग्णाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासनाने ही सर्व गावे कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. या कोरोनाबाधित क्षेत्रातील व्यक्तींना बाहेर जाण्यास किंवा बाहेरील व्यक्तीस या क्षेत्रात येण्यास मज्जाव केला आहे.
जिल्ह्यातून ५ हजार ३४३ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी १६१ नमुन्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे तर ४ हजार ८४० नमुन्यांचा अहवाल हा निगेटीव्ह आला आहे. २६ मे २०२० सायंकाळी ५ वाजेपर्यंत ३३८ अहवाल प्रलंबित होते. जिल्ह्यात उपचार घेऊन घरी गेलेले रूग्ण ५५ असून उपचार घेणार्या रूग्णांची संख्या १०१ आहे.