दोन महिन्यात आठ हजार टन हापूस परदेशात

रत्नागिरी:- कोरोनामुळे कर्नाटकसह विविध आंब्यांची आवक मुंबईत कमी होती. त्यामुळे मुंबईतून निर्यात गेल्या दोन महिन्यात निर्यात झालेल्या साडेआठ हजार मेट्रीक टन आंब्यापैकी सत्तर टक्के हून अधिक हापूस परदेशात पाठविण्यात आला आहे. गतवर्षी याच कालावधीत साडेसोळा हजार मेट्रीक टन आंबा निर्यात झाला होता. तुलनेत पन्नास टक्केच आंबा यंदा पाठविण्यात यश आले आहे.

कोरोनाच्या कालावधीत 2020-21 आर्थिक वर्षात मुंबई येथुन आंब्याबरोबर केळी, लिंबु, मिरची, आले आणि भाजीपाला निर्यात करण्यात आला. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट आणि मुंबईचे विमानतळ निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असुन जगभरात शेतीमाल समुद्रमार्गे आणि हवाईमार्गे यांचेमार्फत पोहच होत आहे. हवाईमार्गे प्रवासी वाहतुक सुरु नसल्यामुळे काही देशांना नाशवंत कृषी माल निर्यातीत अडचणी येत आहे. मालवाहु विमानांद्वारे काही देशांना हवाईमार्गे फळे व भाजीपाला निर्यात करावा लागत आहे. जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट येथुन कंटेनर आणि ट्रेलरसाठी वाहनचालकांची कमतरता असतानाही तसेच वाहतुकीच्या वेळी रस्त्यांवर कोणत्याही जेवणाच्या तसेच वाहन दुरुस्तीच्या सुविधा नसतांनाही समुद्रमार्गे झालेली निर्यात महत्वाची ठरली.
मुंबई येथुन 1 एप्रिलपासून मेच्या मध्यापर्यंत आंब्याची निर्यात 8,640 मेट्रीक टन इतकी झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत 16,746 मेट्रीक टन आंबा निर्यात झाला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत 52 टक्के निर्यात कमी झाली असली तरीही या निर्यातीत हापुसचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. परराज्यातुन आंबा मुंबईत पोहोचण्यात येणा-या अडचणी, बाजार समिती मधील फळ बाजार बंद असणे तसेच हवाई वाहतुक सेवा पुरेशा नसणे यामुळे आंबा निर्यातीत घट झाली आहे. एप्रिलच्या मध्यात हवाई सेवा सुरु करण्यात आली; मात्र प्रवासी सेवा बंद असल्यामुळे वाहतूकीचा दर अडीचपट अधिक होता. त्याचा भुर्दंड आंबा निर्यात करणार्‍यांना बसला. आखाती देशांबरोबर इंग्लडला आंबा रवाना झाला. पण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, चिन, जपानसह काही देशांना निर्यात करण्यात अनेक अडथळे आले आहेत. कोकणातील हापूसच यंदा उत्पादन कमी असल्यामुळे त्याचा निर्यातीवर परिणाम झाला.