रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 161 जणांना कोरोनाची लागण झाली असून जिल्ह्यात कोरोनाने पाचवा बळी घेतला आहे. संगमेश्वर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
संगमेश्वर तालुक्यात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. मुंबईतून रत्नागिरी संगमेश्वर येथे दाखल झालेल्या रुग्णाचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. १९ मे रोजी त्यांना उपचारासाठी रत्नागिरीत नेण्यात आले होते. मागील ८ दिवस ते कोरोनाशी झुंज देत होते. मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 161 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतून रत्नागिरीत येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या फार असून सोमवारी सायंकाळ पर्यंत होम क्वारंटाईन केलेल्याची संख्या 74 हजारापेक्षा अधिक आहे. येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून यामुळ्ये कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका वाढला आहे.