रत्नागिरी:- कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लागण चौदा दिवसांपेक्षा अधिक कालावधीत होऊ शकतो हे लक्षात आले होते. त्यामुळे क्वारंटाईनमध्ये (विलगीकरण) ठेवण्यात येणार्यांचा कालावधी 28 दिवसांपर्यंत करण्यात आला होता; मात्र तो कालावधी पुन्हा चौदा दिवसांचा करण्यात येत आहे. तसे परिपत्रक काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
मुंबईहून अनेक चाकरमानी कोकणात दाखल झालेले आहेत. प्रत्येक दिवशी हा आकडा वाढतच आहे. त्या सर्वांनाच संस्थात्मक क्वारंटाईन करणे शक्य नव्हते. तेवढी जागाच गावागावात उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासनाने सर्दी, तापासह कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेले आणि कंटेंनमेंट झोनमधून आलेल्यांना संस्थात्मक क्वारंटाईन आणि उर्वरितांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. सुरवातीला क्वारंटाईनचा कालावधी चौदा दिवसांचा होता; मात्र चौदा दिवस ओलांडून गेल्यानंतरही काहींना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले होते. कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी क्वारंटाईनचा कालावधी वाढवून 28 दिवस करण्यात आला. मोठ्या संख्येने आलेल्या चाकरमान्यांमध्ये क्वारंटाईन कालावधीवरुन संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यातून ग्रामकृतीदल आणि क्वारंटाईन असलेले चाकरमानी यांच्यात खटके उडत आहेत. क्वारंटाईन कालावधीच्या नवीन आदेशांची माहिती जिल्हाप्रशासनाकडून लवकरच गावागावात दिली जाणार आहे. विलगीकरणाखालील कालावधी चौदा दिवसांचा करण्यात येणार आहे; मात्र त्यापुर्वी त्याला कोरोनाशी निगडीत लक्षणे नसल्याची पाहणी केली जाईल. तशी लक्षणे आढळून आल्यास त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाईल.