रेल्वेच्या विशेष गाडीने सव्वासहाशे लोक रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरले

रत्नागिरी:- रेल्वेच्या काही विशेष प्रवासी फेर्‍या सोडण्यात आल्यामुळे परराज्यात काम करणारे कामगार गावाकडे परतू लागले आहेत. दिल्ली ते मडगाव राजधानी एक्स्प्रेसमधून शनिवारी सुमारे सव्वासहाशे लोक रत्नागिरी स्थानकात उतरले. या प्रवाशांमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांचाही समावेश आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अद्यापही राज्य शासनाने जिल्हा बंदी कायम ठेवली आहे. विविध राज्यात अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी केंद्र शासनाकडून विशेष प्रवासी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काही गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावत आहेत. नवी दिल्लीतून सुटेलेली राजधानी एक्स्प्रेस शनिवारी सकाळी रत्नागिरी स्थानकात दाखल झाली. या गाडीला मोजकेच थांबे आहेत. या गाडीमधून सुमारे सव्वासहाशे प्रवासी उतरले. यामध्ये सर्वाधिक सांगली जिल्ह्यातील प्रवासी होते. दिल्लीसह विविध राज्यात अडकून पडलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील लोकांना गावाकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे दिल्ली-मडगाव गाडीचा आधार मिळाला  आहे. सांगलीबरोबरच कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातीलही काही प्रवासी असल्याची माहिती पुढे येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसल्यामुळे ते प्रवासीही रत्नागिरीत उतरले होते. या सर्व प्रवाशांना रत्नागिरीतून पुढे जाण्यासाठी एसटी बससेची व्यवस्था करण्यात आली होती. ततूर्वी रत्नागिरी स्थानकात प्रवाशांच्या नोंदी घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आली आहे. तसेच प्रवाशांकडून अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक पोलिसांसह रेल्वे पोलिस तैनात केले गेले होते.

कोकणासह मडगाव, उडपी येथे अडकून पडलेले कामगार, मजूर यांना गावी परतण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर 25 गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून सुमारे 30 हजार 400 प्रवाशांनी आपले घर गाठले आहे. त्यात चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, करमाळी, मडगाव, उडपी या स्थानकांचा समावेश आहे. यातील बहुतांश कामगार हे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, झारखंड या राज्यातील होते.