रत्नागिरी :- पापाला नष्ट करून पुण्य कमविणे हा रमजानचा खरा उद्देश आहे. मुस्लिम धर्मियांमध्ये मागील एक महिन्यांपासून रजमान मास सुरू होता. अल्लाच्या आज्ञेचे पालन करणे आणि शांततेचे रक्षण करत महिनाभर दर दिवशी 5 वेळा नमाज अदा करून तीस दिवस रोजा अर्थात उपवास धरले जातात. हा रमजान महिना सोमवारी ईदने साजरा करण्यात आला. पवित्र कुराण याच काळामध्ये प्रकटल्यामुळे या रमजान महिन्याला मुस्लिम धर्मियांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. सोमवारी रत्नागिरी जिल्हाभरात नमाज पठण करून अबाल वृद्धांनी ईद साजरी केली.
ईद या शब्दाचा अर्थ आनंद असा आहे. रमजान महिन्यांतील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर ईद येते. रमजान महिन्याची सांगता ईदने होते. रमजान महिना मुस्लिम धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र सण म्हणून साजरा केला जातो. रमजान महिना संपल्यानंतर चंद्रदर्शन होताच ईद सण साजरा होतो. सोमवारी ईद हा सण मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. यात हिंदू बांधवही सहभागी होतात. सोमवारी येणार्या ईदच्या मुहूर्तावर तरूण-तरूणी, महिला पुरूष सर्वजण नवीन कपड्याची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती.
जिल्ह्यासह साऱ्या देशात कोरोनाचा मोठा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ईद अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला होता. जिल्ह्यात सोमवारी गर्दी न करता ईद साजरी झाली. बुधवारी मुस्लिम बांधवांनी घरीच अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीसह चिपळूण, राजापूर, लांजा, संगमेश्वर आदी तालुक्यांमध्ये ईद शांततेत साजरी करण्यात आली. ईद निमित्त मुस्लीम बांधवांनी आपापल्या मित्र परिवारासाठी मेजवानीचेही आयोजन केले होते. केवळ उपवास किंवा रोजे करून पाप अथवा पूण्य मिळत नसते, त्यासाठी जकातही करावी लागते. जकात म्हणजे दान होय. आपल्या ऐपतीप्रमाणे मुस्लिम बांधवांनी या ईद सणाच्या पार्श्वभूमीवर दानही केले.