रत्नागिरी:- सद्यस्थितीत कोरोना स्वॅबची तपासणी मिरज येथील प्रयोगशाळेत होत आहे. यामुळे तपासणी अहवाल मिळण्यास अनेकदा विलंब होत असल्याने रत्नागिरी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अशी प्रयोगशाळा हवी अशी मागणी होती. या स्वरुपाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनातर्फे पाठविण्यात आला होता. याला शासनाची मंजूरी प्राप्त झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत 5 हजार 306 जणांचे नमुने तपासणी करिता घेण्यात आले आहेत. यापैकी 156 अहवाल पॉझिटिव्ह अहवाल तर तब्बल 4 हजार 722 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 372 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 74 हजार 124 इतकी मोठी आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या 1 लाखापेक्षा अधिक होण्याची भीती आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नमुने तपासण्यासाठी स्थानीक पातळीवर लॅब असणे आवश्यक होते. ही मागणी नामदार उदय सामंत यांनी लावून धरली. जिल्ह्यात येण्यासाठी अर्जांची संख्या 46 हजार पेक्षा अधिक आहे. तर संस्थात्मक क्वारंटाईन खाली असणाऱ्यांची संख्या 213 आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने कोरोना तपासणी लॅब जिल्हा शासकीय रुग्णालयात उभारण्यास मंजुरी दिली आहे.